कारंजात पुन्हा दोन ठिकाणी घरफोडी नवीन वसाहती चोरट्यांच्या रडारवर
कारंजा लाड – शहरातील यशोदा नगरात १८ मे रोजी ६ ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे उघडकीस आले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दोन घरातून ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला तर चार घरात मुद्देमाल न सापडल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या घटनेतील आरोपींचा शोध लागण्यापूर्वीच गुरुवारी १३ जूनच्या रात्री शहरातील मातोश्री कॉलनी व लगतच्या सुंदर वाटीका कॉलनीत पुन्हा दोन घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १४ हजार रुपये रोख लंपास केले. ही घटना गुरुवारी १३ जून रोजी रात्री अडीच वाजता चे
दरम्यान उघडकिस आली.
मागील काही दिवसांपासून शहरातील नवीन वसाहती चोरट्यांच्या रडारवर असून, घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी केली जात आहे. शहरातील मातोश्री कॉलनीत वास्तव्यास असलेले परमानंद वसंतराव कांबळे हे बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश मिळविला व नगदी ९००० रुपये लंपास केले तर मातोश्री कॉलनीला लागून असलेल्या सुंदर वाटिका कॉलनीतील राजेश उद्धवराव येळणे यांच्या घरात सुद्धा त्याच पद्धतीने
प्रवेश मिळवून त्यांचे घरातील रोख ५ हजार रुपये चोरून नेले. हे दोघेही जण बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरी कोणी नव्हते. नेमका याच संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत गुरुवारी रात्री त्यांच्या घरात प्रवेश मिळविला आणि १४ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. यासंदर्भात परमानंद कांबळे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन वसाहतीत होत असलेल्या घरफोड्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवावा अशी मागणी करण्यात येत आहे.