आरक्षण वाचविण्याच्या लढाईत सहभागी व्हा! 

आरक्षण वाचविण्याच्या लढाईत सहभागी व्हा! 

 * प्रा. लक्ष्मण हाके यांचे आवाहन 

वाशिम : (  दि. 28 जून )

 लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे.  मराठा समाजाने ओबीसीतूनच आरक्षणाचा हट्ट धरल्यामुळे ते सुद्धा आता धोक्यात आले आहे.  आजघडीला ओबीसी शांत राहिला तर असलेले आरक्षण सुद्धा पळविले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवून लढाईत सहभागी व्हावे. असे आवाहन ओबीसी संघर्ष योद्धे प्रा.  लक्ष्मण हाके यांनी केले. 

 स्थानिक संत सावता महाराज मंदिर सभागृहात दि. 27 जून रोजी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

 मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि ओबीसींचे आरक्षण अबाधित रहावे.  यासाठी प्रा.  लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी वडीगोद्री येथे नऊ दिवस उपोषण केले.  या उपोषणाला राज्यातील ओबीसी बांधवांनी भक्कम पाठिंबा दिला.  या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षण वाचविण्याची मोठी चळवळ राज्यात निर्माण झाली आहे.  हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आणि ओबीसी मध्ये जनजागृती करण्यासाठीप्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी अभिवादन यात्रा सुरू केली आहे.  सिंदखेड राजा येथून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून दि.  26 जून रोजी या यात्रेची सुरुवात झाली. दरम्यान, विविध गावांना भेटी देत पोहरादेवी येथे येऊन गुरुवारी सकाळी ते वाशिम येथे दाखल झाले.  

 शहरात आगमन होताच ओबीसी बांधवांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर,  छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून संत सावता महाराज मंदिर सभागृहात त्यांनी ओबीसी बांधवांना संबोधित केले.  

 यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की,  मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले आहे.  हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे. ओबीसीची जातनिहाय जनगणना होऊन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढविण्याची गरज आहे. असे असताना राजकीय व सामाजिक दृष्ट्या पुढारलेली जमात असलेल्या मराठा समाजाने ओबीसीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे. यामुळे मूळचा ओबीसी जो छोट्या छोट्या अठरापगड व्यावसायिक मागास जातींमध्ये विखुरला आहे.  हा संपूर्ण वर्ग मराठ्यांच्या मागणीमुळे भयभीत झाला आहे.  म्हणून ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही हा लढा उभारला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली असल्याचे प्रा. हाके यांनी सांगितले. 

 अधिक बोलताना ते म्हणाले की,  विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आणि मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे. त्यांचे मंत्री जरांगे यांच्या आंदोलनाला भेट देऊन घटना विरोधी कृत्य करत आहेत.  शिंदे सरकार हे ओबीसी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून बेकायदेशीर कुणबी नोंदी करत आहे.  हा प्रकार त्यांनी थांबविला नाही तर येत्या निवडणुकीत याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा प्रा. हाके यांनी यावेळी दिला. 

 राज्यातील मराठे जर मागासलेले असतील तर मग राज्यात पुढारलेले कोण आहेत हे त्यांनी सांगावे, असा प्रश्नही त्यांनी केला.  सगेसोयरे हा कन्सेप्ट संवैधानिक नाही,  अशाप्रकारे कुठल्याही कोर्टाचे जजमेंट सुद्धा उपलब्ध नाही. तसेच सुप्रीम कोर्टासह विविध आयोगांनी व समित्यांनी मराठा समाजाला मागास ठरविलेले नाही.  त्यामुळे त्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत  नाही.  तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सल्लागारांचा मराठ्यांना ओबीसीत घालण्याचा डाव खेळला जात आहे. हा डाव कुठल्याही परिस्थितीत म्हणून पाडू आणि ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवू, असा निर्धार प्रा. हाके यांनी व्यक्त केला. या बैठकीला सकल ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )