उत्पन्न दाखल्यासाठी उडाली झुंबड !
शिरपूर जैन – नुकतीच महाराष्ट्र शासनाने ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात केली. या योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला व अन्य कागदपत्राची जुळवा जुळव करण्यात सध्या महिला व्यस्त आहेत. उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शिरपूर येथे महिलांची एकच झुंबड पाहायला मिळत आहे. यामुळे अधिकारी वर्गावर ताण वाढणार आहे हे नक्की! महिलांचे आरोग्य पोषण व आर्थिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर महिन्याकाठी पंधराशे रुपये जमा होणार आहेत.
१ जुलै २०२४ पासून या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे. परंतु, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, आधार कार्ड, अडीच लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला किंवा डोमिसिअल दाखला, बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. यात महिलांसाठी २१ वर्षे ते ६० वर्षापर्यंत वयोमयदिची अट आहे. परंतु, या योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत असल्यामुळे उत्पन्नाचा दाखला, डोमिसिअल दाखला, आदी कागदाची लवकरात लवकर जुळवाजुळव व्हावी यासाठी
सध्या येथे महिला गर्दी करीत आहेत. येथील सेतू केंद्रावर सकाळ पासूनच महिलाची गर्दी पाहायला मिळत आहे. सेतू केंद्रावर लांबच लांब रांगा आढळून येत आहेत. या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला, डोमिसिअल दाखल्याची प्रमुख अट असल्यामुळे उत्पन्नाचा दाखला बनविण्यासाठी महिलांनी सेतू केंद्राकडे धाव घेत गर्दी केली आहे. कागदपत्रे गोळा करून नोंदणी करण्यासाठी १५ जुलै पर्यंत असलेली वेळ कमी होत होती त्यात अजून शासनाकडून काही अटी कमी करण्यात आल्या व फॉर्म भरण्याची मुदत आता शासनाने वाढवून ऑगस्ट महिन्याच्या शेवट पर्यंत केल्याने महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे