एनसीसी विद्यार्थ्यांची पथनाट्यातून वाशिम शहरात जनजागृती
आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवनविरोधी दिन साजरा
वाशिम – आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवनविरोधी दिनी २६ जुन रोजी स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) च्या विद्यार्थ्यांनी एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात पथनाट्याच्या माध्यमातून तसेच शहरातून रॅली काढत नागरीकांना अंमली पदार्थापासुन दुर राहण्याचे आवाहन केले.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व सहाय्यक समाजकल्याण आयुक्त मारोती वाठ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यानंतर ही रॅली बसस्थानक चौक, सिव्हील लाईन मार्गे मार्गस्थ होवून समाजकल्याण कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. मार्गात एनसीसी विद्यार्थ्यांनी हातात अंमली पदार्थविरोधी घोषणेचे फलक घेत घोषणा दिल्या. रॅलीमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. अंमली पदार्थ सेवन हा एक मानसिक आजार आहे. याचा वाईट परिणाम हा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर होतोच. मात्र कुटुंब आणि समाजावर याचा परिणाम होत असतो. अंमली पदार्थ जसे की, अफू, गांजा, चरस, कोकेन, भांग, झेंडूबाम आदी रुमालावर लावून त्याचा वास घेतात. शिवाय वेदनाशामक गोळ्या, व्हाइटनर याचाही वापर केला जात आहे. अंमली पदार्थ वेळेवर न मिळाल्याने किंवा महाग झाल्याने युवकांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. आपले जीवन सुंदर आहे. ते एकदाच मिळत असते. त्यामुळे अंमली पदार्थापासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या. अंमली पदार्थापासून दूर रहा असा संदेश देणारी पोस्टर्स विद्यार्थ्यांनी साकारली व रॅली आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. या सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.