काटा येथे चोऱ्यांचे सत्र ग्रामस्थ भयभित, पोलीस सुस्त
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) – तालुक्यातील ग्राम काटा येथे सतत होत असलेल्या चोर्यांच्या सत्रामुळे ग्रामस्थ भयभित झाले असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कायदा व सुवव्यवस्थेची बाजु सांभाळणार्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेप्रती ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
काटा येथे मागील २२ जूनपासून सतत चोर्यांचे सत्र सुरु आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरांच्या टोळींकडून घरफोडी व चोर्या करुन ग्रामस्थांच्या मौल्यवान वस्तु लंपास केल्या जात आहेत. २२ जूनच्या रात्री १० ते १५ चोरांच्या टोळीने गावात घुसुन अनेक घरांची तोडफोड, रोख रक्कम व
मौल्यवान वस्तु चोरीच्या घटना घडल्यामुळे गावकरी दहशतीत आले आहेत. यामध्ये माणिकराव शेषराव जाधव, गजानन प्रभाकरराव देशमुख, उत्तम टाले, ज्ञानेश्वर धनवाईक, विजय विनायकराव देशमुख, विठ्ठलराव देशमुख यांच्यासह इतर गावकर्यांच्या घराच्या दरवाजाची कडी लावून विजय देशमुख यांच्या घरी चोरी करण्यात आली. यामध्ये चोरट्यांनी अलमारीतील रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यांची चोरी केली. तसेच आजुबाजुच्या घरातील दरवाजे, खिडक्यांची तोडफोड करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीसांकडून
अद्यापही चोरट्यांचा शोध घेतला जात नसल्याने गावकरी भयभित झाले आहेत. चोरांच्या भितीमुळे गावकरी रात्ररात्र गावात पहारा देवून रात्र जागून काढत आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांना दिवसा शेतात काम व रात्र गावात जागुन काढावी लागत आहे. काटा गावात सतत होत असलेल्या चोर्यांच्या मालीके मुळे गावकर्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला असून महिला व लहान बालके तणावात जगत आहेत. गावात होत असलेल्या चोरी प्रकरणाची ग्रामीण पोलीसांनी गंभीरतेने दखल घेवून चोरांच्या टोळीला पकडावे व ग्रामस्थांना भयमुक्त करावे अशी मागणी काटा ग्रामस्थांकडून केली जात आहे.