केदारनाथ धाम मंदिरात २२८ किलो
सोन्याच्या जागी पितळ बसवलं
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप
नवी दिल्ली दिल्लीच्या बुराडी परिसरात बाबा केदारनाथ यांचे प्रतिकात्मक मंदिर बांधले जाणार आहे. यावरून आता उत्तरेत राजकारण तापले आहे. या नव्या मंदिरामुळे केदारनाथ धाम येथे नाराजी पसरली असून त्यांनी या नव्या मंदिराचा विरोध दर्शविला आहे. त्यातच बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज केदारनाथ मंदिरातून चोरी झालेल्या सोन्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली. मुंबईत त्यांनी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना विविध राजकीय विषयांसह धार्मिक विषयावरही सडेतोड भाष्य केले.
उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोने चोरी करून त्याठिकाणी पितळ ठेवले असल्याचा आरोप मागच्या वर्षी पहिल्यांदा करण्यात आला होता. मंदिरातील पुजाऱ्यांनीच हा
आरोप केला होता. मात्र या आरोपाची छाननी करण्यास मंदिर समितीने ठाम विरोध दर्शविला. मंदिराचे पुजारी आणि चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष संतोष त्रिवेदी यांनी मागच्यावर्षी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून सोने चोरी झाल्याचा आरोप केला होता.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीबाहेर माध्यमांशी
बोलताना म्हणाले, केदारनाथ मंदिरात २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाला आहे. यावर माध्यमे आवाज का उचलत नाहीत. आता दिल्लीत नवे केदारनाथ मंदिर बांधायची तयारी सुरू आहे. म्हणजे तिथेही नवा घोटाळा करणार का? केदारनाथ मंदिरातील सोन्याची चोरी झाल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी समिती का नाही स्थापन केली? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते पुष्कर
सिंह धामी यांनीही दिल्लीतील मंदिर निर्माणाला विरोध केला आहे. बाबा केदारनाथ धाम जगात इतर कुठेही दुसरे बनू शकत नाही. तसेच जर केवळ केदारनाथ मंदिर बांधले जात असेल तर त्याला आमचा विरोध नाही, पण केदारनाथ धाम एकच असेल. यासाठी त्यांनी बद्री केदारनाथ धाम समितीला यात लक्ष घालून दिल्लीतील मंदिर समितीशी चर्चा करण्याची सूचना केली.