कोरड्या विहिरीत अर्भकाचे तुकडे सापडल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कारंजा लाड – तालुयातील दुघोरा येथील एका पडीत कोरड्या विहिरीत आढळून आलेले हाडामांसाचे तुकडे हे एका नवजात अर्भकाचे असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दुघोरा येथील गोलू भगत यांच्या शेतातील कोरड्या पडीत विहिरीत लहान बाळाच्या हाडामांसाचे दोन तुकडे आढळून आले होते.
पोलिसांनी गावकर्यांच्या मदतीने विहिरीत उतरून हे छोटे छोटे हाडाचे दोन तुकडे बाहेर काढले होते. परंतु, ते तुकडे मानवी आहे की प्राण्याचे हे कळत नसल्याने ते एका प्लॅस्टीकच्या भरणीत भरून तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅब औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात विहिरीत आढळून आलेले हाडामांसाचे तुकडे हे बाळाच्या जन्मापूर्वी अर्थात सात महिण्याच्या गर्भ असतानाचे किंवा जन्मानंतर काही महिन्याचे अर्भक असल्याचे निष्पन्न झाले
आहे. त्यामुळे सदर मृत अर्भक हे अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक विहिरीत फेकून दिले. बाळाचा जन्म झाल्याचे लपविण्यासाठी त्याचा मुद्दामून नाश केला आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गणेश विठ्ठलराव चाटे (वय ५०) रा. दुघोरा यांची फिर्याद व फॉरेन्सीक लॅब औरंगाबाद यांच्या वैद्यकीय अहवालावरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ९४ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.