दिव्यांगांचे दुसऱ्यांदा आमरण उपोषण
वाशीम – स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनाची तयारी सुरू असताना मूलभूत गरजा ही पूर्ण न झालेल्या आणि राहण्यासाठी निवाराही नसलेल्या मंगरूळनाथ तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ ऑगस्ट रोजी दुसर्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे.
मंगरूळनाथ तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील बर्याच दिव्यांग बांधवांना राहण्यासाठी घर नाही तसेच शौचालयाचीही व्यवस्था नाही. त्यांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देण्याची गरज असतांना प्रशासनाने आजपर्यंत ही त्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला नाही. याबाबत त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. गतवर्षी सुद्धा १३ ऑगस्ट रोजी दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त वाठ यांनी उपोषण मागे घेण्याबाबत लेखी पत्र देऊन दिव्यांगांच्या घरकुलाचा तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्षभरानंतरही याबाबत कुठलीच हालचाल झाली नाही.
सुखदेव रामेश्वर राठोड या दिव्यांग बांधवाच्या पुढाकारातून अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या घरकुलासाठी आंदोलन केले जात आहे. या माध्यमातून अस्थिव्यंग व विधवा यांना घरकुलातील पात्र व अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे. जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्राम पंचायतच्या उत्पन्नातून पाच टक्के निधीतून भूखंड विकत घेऊन घरे बांधून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दुसर्यादा दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला घरकुलाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.