निवडणूकीपूर्वी वयोवृद्ध कलावंताना मानधन मंजूरी न मिळाल्यास विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार – संजय कडोळे
वाशिम मार्च महिन्यात नविन वयोवृध्द कलावंतांचे सादरीकरण होवूनही अद्याप त्यांच्या फाईली लालफितशाहीत अडकले आहेत. तर अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. त्यामुळे वृध्द कलावंतांना मंजुर यादी आणि मानधनाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीपुर्वी वयोवृध्द कलावंतांनांच्या मानधनास मंजूरी न मिळाल्यास सर्व कलावंत विधानसभा निवडणूकीवर बहीष्कार टाकतील असा इशारा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी शासनाला दिला आहे.
कला हेच जीवन मानून आपले आयुष्य समाजाच्या मनोरंजन आणि समाजप्रबोधना करीता वेचणार्या कलाकाराच्या जीवनात वृद्धापकाळी भाकरीसाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली असून गेल्या पाच वर्षात पालकमंत्र्याकडून जिल्हास्तरीय वृद्ध कलावंत मानधन निवड समिती स्थापन न झाल्याने समाजकल्याण कार्यालयात शेकडो नविन कलावंतांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. मात्र संघटनेचा सततचा पाठपुरावा आणि आंदोलनाची फलश्रुती म्हणून मार्च महिन्यात या नविन कलावंतांचे सादरीकरण घेण्यात आले. मात्र आता जुन महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप नविन प्रस्ताव मंजुरीच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गेल्या पाच
वर्षापासून प्रस्ताव दाखल करणार्या नविन वयोवृध्द कलावंतांना शासन प्रशासनाच वेळकाढू धोरणामुळे मानधनासाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. यापैकी अनेक वृध्द कलावंत मानधनाच्या प्रतिक्षेत मृत्युमुखी पडले आहेत. मानधन मंजुरीसाठी ग्रामीण भागातील कलावंत समाजकल्याण कार्यालयात चकरा मारुन कंटाळले आहेत. ही बाब प्रशासनाने लक्षात घेवून येत्या निवडणूकीपुर्वी कलावंतांच्या याद्या प्रसिध्द करुन मानधनाची पुढील कार्यवाही सुरु करावी. अन्यथा जिल्हयातील सर्व कलावंत विधानसभा निवडणूकीवर बहीष्कार टाकतील असा इशारा कडोळे यांनी दिला आहे.