बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार ?
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू महायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभेत बच्चू कडूंनी २० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या मुंबईत बैठकही आयोजित करण्यात आली आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
उद्या मुंबईत पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीला पक्षाचे राज्यातील २० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आगामी विधानसभा निवडणूक कशाप्रकारे लढवायची याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. येत्या विधानसभेत महाविकास आघाडीबरोबर जायचं की महायुतीबरोबर थांबायचं की स्वतंत्र लढायचं याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्ही २० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितलं.
यावेळी महायुतीत बरोबर असतानाही २० जागा लढवणार का? असा प्रश्न विचारला असता, महायुतीत असलो तरी याचा अर्थ आम्ही निवडणूक लढवू नये, असा होत नाही. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, निवडणूक लढवणं हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुख्य उद्देश असतो, त्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या २० जागा या केवळ विदर्भातल्या असतील की संपूर्ण महाराष्ट्रातल्या, असं विचारलं असता, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या २० जागांवर निवडणूक लढवू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार झाला, तरी मला मंत्रीपद मिळणार नाही आणि त्यांनी मला मंत्रिपद दिलं, तरी मी ते घेणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.