मनविसेचे यश चव्हाण यांच्या उपोषणाला यश

मनविसेचे यश चव्हाण यांच्या उपोषणाला यश

जि.प. मार्फत समिती नेमून २० दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन

वाशिम प्रतिनिधी : तालुक्यातील अनसिंग येथील ग्राम पंचायत मार्फत आणि शासनाच्या विविध योजनेच्या निधीतून झालेल्या सर्व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी व यास जबाबदार असलेल्या सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि पदाधिकार्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनविसेचे यश चव्हाण यांनी केलेल्या आमरण उपोषणाला यश आले असून, जिल्हा परिषदेमार्फत एक समिती नेमून २० दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे.



अनसिंग ग्रामपंचायतीने सरकारी दवाखाना परिसरात नालीच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. कचर्यावर योग्य प्रक्रिया व नियोजन करण्यात येत नाही. पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीवर लाखो रूपयाचा खर्च दाखवून भ्रष्टाचार होत आहे. मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये दररोज स्वच्छता, साफसफाई न करता लाखो रुपयाचा अपहार, गावातील प्रभाग क्रं. ६ मध्ये लावण्यात आलेले लाईटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन दुरुस्तीच्या नावावर दरवर्षी लाखो रूपयाचा अपहार होत आहे, पंतप्रधान आवास, रमाई आवास, एम.आर.ई.जि.एस. अंतर्गत नागरिकांना व शेतकर्यांना मिळणार्या अनुदानात पैशाची मागणी करुन त्रास देणार्याची चौकशी करावी, १५ वा वित्त आयोग अंतर्गत महिला व बालकल्याण, शाळा मागासवर्ग वस्ती मध्ये ईतर कामामध्ये हजारो रूपयाचा अपहार, या अन्य कामामध्ये मोठ्या प्रमाणात होणार्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन कामयस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा आदी मागण्यांसाठी सदर उपोषण करण्यात आले होते.

वरील मुद्यांवर योग्य ती चौकशी करुन चौकशी देण्याचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण सोडविताना माजी सरपंच विठ्ठल सातव, मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, माजी जि.प. सदस्य नथ्थुजी कापसे, चंद्रकांत ठाकरे, अनिल ठाकरे, नंदू सातव, गजु कुटे, शुभम काळे, मनसे ता. अध्यक्ष विठ्ठल राठोड, अनंता ढोके, पवन भालेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )