महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महसूल संघटनेचा निर्णय
मुंबई, दि.२३ : महसूल
विभागातील कर्मचाऱ्यांचा संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी संप मागे घेण्याचे आवाहन करून
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री श्री. विखे पाटील यांचे आभार मानले.
महसूल कर्मचाऱ्यांच्या
विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, राज्य महसूल संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, मुंबई उपनगर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष अविनाश सांगाडे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांच्या
पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील १५ जुलैपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. मंत्री श्री. विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी शासन
सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले