माझी लाडकी बहीण योजनाः
जिल्ह्यातील ८५ हजारांपेक्षा जास्त महिलांनी भरले अर्ज ३० हजार ५०१ सर्वाधिक अर्ज कारंजा तालुक्यात
वाशिम, दि. १७ जुलै (जिमाका) राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना राबविण्याबाबत शासन निर्णय दि.२८ जुन २०२४ अन्वये मान्यता देण्यात आली. राज्य सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’नेची अधिकृत घोषणा केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण
जिल्ह्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने वाशिम तालुक्यातील १८ हजार २९० रिसोड तालुक्यातील ८ हजार ७३६, मालेगाव तालुक्यातील ९ हजार ८०८, मंगरूळपीर तालुक्यातील ८ हजार ५७१, कारंजा तालुक्यातील ३० हजार ५०१, मानोरा तालुक्यातील ७ हजार ३९१, वाशिम शहरी भागातील २ हजार २०८ अश्याप्रकारे १६ जुलैपर्यंत २३ हजार २८८ ऑनलाईन व ६२ हजार २१७ ऑफलाईन असे एकुण ८५ हजार ५०५ महिलांनी सदर योजनेचे अर्ज भरले आहे