वाशीम जिल्ह्यातील ‘लखपती दिदी’ राज्यात नंबर वन
वाशीम – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एम एस आर एल एम) अंतर्गत स्वयंसहायता समुहामध्ये समाविष्ट महिलांचे सन २०२४-२५ मध्ये विविध उद्योग व्यवसायामार्फत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून गटातील (महिलांना) दीदींना लखपती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये वाशीम जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये आघाडी घेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
लखपती दीदी करण्यासाठी वाशीम जिल्ह्याला ३७३०० एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे तसेच प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसआरएलएम चे जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी जोमाने काम करीत आहेत. यामध्ये सर्वप्रथम गावस्तरावर उमेद अभियानाला जोडलेल्या महिलांचे उत्पन्नाचे स्रोत शोधून त्यांच्या
उत्पन्नात अधिक भर देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विविध उद्योग व्यवसाय बाबत मार्गदर्शन करणे, कृतीसंगम व उमेद अभियान अंतर्गत विविध कर्ज उपलब्ध करून देणे ही कामे करण्यात येत आहेत. गटातील प्रत्येक महिलांचे वैयक्तिक उत्पन्न एक लाखाच्यावर
न्यायचे आहे.
सन २०२४-२५ मध्ये लखपती दीदीचे १०० टक्के
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामधील लखपती दीदी यांची नोंदणी करून याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र स्तरावरून कार्यान्वित पोर्टलवर अद्यावत करण्यात येत आहे. यामध्ये वाशीम जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमस्थानी आहे. सीईओ वैभव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम आणि प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी याबाबत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
(एमएसआरएलएम) अंतर्गत स्वयंसहायता समुहामध्ये समाविष्ट महिलांचे उल्पन्न लाखाच्या वर नेण्याची ही जी प्रक्रिया सुरु झाली आहे, त्यामध्ये एमएसआरएलएम च्या संपूर्ण टिमने यापुढेही अशीच आघाडी ठेवावी आणि जिल्ह्यातील लखपती दिदिंचे उद्दिष्ट पुर्ण करावे.