शासकीय योजनांतून उद्योग व्यवसायात भरारी घ्या !
जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन
वाशीम – उद्योजक बनण्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून उद्योग व्यवसायात भरारी घेवून आपले स्वप्न साकार करण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे यांनी केले. छत्रपती बहुउद्देशिय तरुण मित्रमंडळ व्दारा संचालित गुरु रविदास शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १३ जुलै रोजी स्थानिक शुक्रवारपेठ भागात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत निशुल्क कर्ज वितरण अर्ज भरणे व उद्योग संधी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गौरव इंगळे यांनी उद्योग संधी या विषयावर सुशिक्षीत
बेरोजगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सविता वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते गुरु रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना गौरव इंगळे म्हणाले की, नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा सेवा किंवा निर्मिती क्षेत्रातील उद्योग व्यवसाय करावा. त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. उद्योग व्यवसायाची निवड, उपलब्ध संसाधने, उद्योजकतेचे आवश्यक गुण, उद्योगासंबंधीत कायदे, नियम, नीतिमत्ता व व्यवहार, बँक
प्रणाली, विक्री कला व बाजारपेठ, आधुनिक युगासोबत स्वतःला तयार करत उद्योग व्यवसाय कसा करावा, समूह उद्योगातून विकास, सी. एफ. सी. सेंटर इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आशिष जोशी यांनी सुद्धा उद्योग व्यवसायात डिजिटल मार्केटिंगचे किती महत्व आहे हे पटवून दिले. कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे ललिता सांगळे, उमेश देवळे यांनी लाभार्थ्यांचे कर्जाचे अर्ज निःशुल्क भरून घेतले. कार्यक्रमाला परिसरातील युवक, युवतींची बहूसंख्येने उपस्थिती होती. केंद्राच्या संचालिका सविता वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.