समृद्धी महामार्गावर ट्रक पलटी एक जण गंभीर जखमी
कारंजा लाड नागपूर मुंबई स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील लोकेशन १५९ वर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेत ट्रक मधील एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना १८ जुलैला रात्री साडे ९ वाजताच्या दरम्यान मागून येणार्या ट्रकला रस्ता देत असताना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमोल मदन जराड (वय १८) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो जालना जिल्ह्यातील राजूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अपघात ग्रस्त ट्रक संभाजीनगर येथून नागपूरकडे जात असताना त्यात तीन जण बसले होते. मार्गातील अपघात स्थळी मागून येणार्या ट्रकला रस्ता देताना हा ट्रक पलटी झाला. त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताच्या घटनेनंतर रुग्णवाहिका चालक आतिश चव्हाण व डॉ. गणेश यांनी जखमीला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी बाहेरगावी जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.