सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हास्तरीय तंबाखूमुक्त शाळा कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद
वाशिम सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने व जि. प. शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, ८ जुलै रोजी येथील सुंदर वाटिका स्थित श्री समर्थ शाळेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच तज्ञ शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सारिका कदम, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाचे डॉ. सरकटे,
धाडवे व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे गायकवाड, अमोल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले की, तंबाखूमुक्त शाळा करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. भावी पिढीला या विळख्यातून वाचवायचे असेल तर हे काम सर्वांनी आपले कर्तव्य समजून अग्रक्रमाने करण्याचे त्यांनी सूचित केले. तंबाखूजन्य पदार्थामुळे देशातील तरुणाई मानसिक व शारीरिक हानी करुन
घेत आहे. काळानुसार व्यसनाच्या पद्धती बदलत गेल्या. मात्र तंबाखूच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम वाढत गेले. हे थांबविण्यासाठी प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे. सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सारिका कदम यांनी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी कोणत्या नऊ निकषावर काम करुन शाळा तंबाखूमुक्त करावी याविषयी डॉ. सरकटे व धाडवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अमोल काळे म्हणाले की, तंबाखू या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी लागेल. त्यासाठी व्यसनमुक्तीची संकल्प प्रतिज्ञा प्रत्येक शाळेने घ्यावी. वर्षातून किमान पाच ते सात उपक्रम व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर घ्यावेत असे काळे म्हणाले. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे ६५
तज्ञ प्रशिक्षक व अधिकारी वर्ग उपस्थित होते. या शिक्षकांनी तज्ञ शिक्षक म्हणून प्रशिक्षण पुर्ण केले. तालुक्यातील सर्व शाळेतील शिक्षकांचे लवकरच तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. जिल्हास्तरीय तंबाखूमुक्त कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशनच्या विभाग प्रमुख सारिका कदम, अमोल काळे, संजय लहाने, रत्नाकर घुगे, दीपक मार्गे यांनी परिश्रम घेतले.