सैनिकांमुळे नागरिकांचे जीवन सुरक्षित विश्वनाथ घुगे २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
वाशिम सैनिकांच्या शौर्याचा दिवस म्हणून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. शहिद सैनिकांचे स्मरण करण्यासोबतच पुढील पिढीमध्ये देशभक्तीची, त्यागाची व शौर्याची भावना या माध्यमातून जागृत करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वतःच्या तारुण्याचा, कुटुंबाचा विचार न करता आपले जबान देशासाठी सीमेवर लढत असतात. त्यांच्यामुळे सामान्य माणसांना सुरक्षितपणे जीवन जगता येते. आपण प्रत्येक जण सीमेवर लढू शकत नाही, मात्र आपल्या सैनिकांसारखे काहीतरी चांगले काम निश्चितच करू शकतो, ते करण्यासाठी तरुणानी पुढे यावे, असे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. कारगील विजय दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाच्या दिवसांपैकी एक आहे. शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. यादिवसाच्या सन्मानार्थ आजचा २५ वा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहीदांच्या प्रतिमेस श्री. घुगे यांच्याहस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक संजय देशपांडे, रविंद्र डोंगरदिवे, दिनेश आपटे, शिवशंकर झाडोकार, माणिक इंगळे, महसुल तहसीलदार प्रिया सुळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती सविता डांगे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी, माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी श्री. हवालदार व श्री. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन कल्याण संघटक संजय देशपांडे यांनी केले.