हर घर तिरंगा
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व गर्भसंस्कार शिबीराचा गरोदर मातांनी घेतला लाभ हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा मेळावा उत्साहात
वाशिम, दि. १० ऑगस्ट (जिमाका)
१२ आठवड्याच्या आत पहिली सोनोग्राफी करून घेतल्यास गरोदरपणातील संभाव्य धोके टाळता येतात. तसेच गरोदरपणात कोऱ्या चहाचे सेवन न करता रोज किमान ७५ ते १०० मिली दूध गरोदर मातेने प्यायला हवे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीम. बुवनेश्वरी एस. यांनी केले.
“कोऱ्या चहाच्या सेवनाने गरोदर मातेमध्ये व्हिटॅमिन ‘बी- १२’ ची कमतरता येते. दूध हे व्हिटॅमिन ‘बी-१२’ चा मुबलक स्रोत असून गरोदर मातांनी नियमितपणे ७५ ते १०० मिली दूध पिले पाहिजे. तसेच गरोदरपणाच्या पहिल्या तीन
महिन्याच्या आत पहिली सोनोग्राफी करून घेतल्यास गरोदरपणामधील उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे यांनी दिली.
“उज्वल, सक्षम व संस्कारी पिढी घडविण्यासाठी गरोदरपणात गर्भसंस्कार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तांदळी उपकेंद्रातील तिरंगा मेळाव्यास उपस्थित गरोदर मातांना प्रतिकात्मक तिरंगा झेंड्याचे वाटप करताना डॉ.पी.एस. ठोंबरे यांनी केले. तसेच सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गतएकूण १४४७ गरोदर मातांची आजच्या मेळाव्यात तपासणी झाली असून त्यामध्ये २९% अतिजोखमीच्या माता आढळून आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.आज मालेगाव तालुक्यातील आयुर्वेदिक दवाखाना आमखेडा
येथे मानव विकास मिशन आणि प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत गरोदर माता यांचे गर्भसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. याकरिता विशेष करून जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी सर्व गरोदर
मातांनी आपल्या गर्भावर कसे संस्कार करायला हवे याचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गरोदर मातांनी गरोदरपणाच्या कालावधीत कशा प्रकारे मानसिक आरोग्य जपायला हवे, कसे आचरण असावे, कसा आणि कोणता विचार करावा, काय ग्रहण करावे,
आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, नातेसंबंध कसे जपावेत, चुका कशा मान्य कराव्यात आणि क्षमा गुण कसा अंगीकारावा, काय आहार घ्यावा, कोणता व्यायाम करावा, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित गरोदर मातांना प्रतिकात्मक तिरंगा झेंड्यांचे
वाटप करून तिरंगा मेळावा सुद्धा घेण्यात आला.
या शिबिरात एकूण ३० गरोदर माता, १२ स्तनदा माता, १२ लहान बालके यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ११ गरोदर माता अतिजोखमीच्या माता आढळून आल्या त्यांना सल्ला वमार्गदर्शन करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन आयुष दवाखाना आमखेडा येथील डॉ. वृषाली देशमुख यांनी केले. त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हीराजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली देंडवे व आरोग्य सहाय्यक श्री करवते, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मालेगाव येथील आरोग्य सहाय्यक सुधाकर काळे, आरोग्य सेवक किरण जिरवणकर, रामकृष्ण फड, संदीप नप्ते, तसेच आरोग्य सेविका कविता घुगे, वंदना खुळे, अरुणा चौरे, तसेच सर्व आशा स्वयंसेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.