१३ जुलैपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…
मुंबई सरकार येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं आहे, तोवर कुणीही गाफील राहू नका, असा सल्ला मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जरांगे यांनी संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिलं नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला उद्देशून म्हणाले, गाफील राहू नका, हा माझा नेता, तो तुझा नेता असा वाद घालत बसू नका. आपण इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो आहोत. आता आपल्या मुलांना कसं मोठं करता येईल ते पाहा. अनेकांनी आपल्या
मुलांना मरताना पाहिलं आहे. आरक्षण नसल्यामुळे खचलेलं पाहिलं आहे. परंतु, आता आपली लेकरं मोठी करायची आहेत आणि आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण थांबायचं नाही.
मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले, मी सर्वांना शेवटचं सांगतो, संपूर्ण ताकदीने एकत्र राहा. आपली शक्ती कमी पडू देऊ नका. या सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपण महाराष्ट्रातील मराठा समाजाची सर्वात मोठी बैठक आयोजित करू. एका विशाल मैदानावर ही बैठक घेऊ आणि या बैठकीत आपण पुढचं नियोजन करू. या सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही
तर काय करायचं याचा निर्णय त्या बैठकीत घेऊ. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल.
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजातील लोकांना १०० टक्के मतदान करण्याचं आवाहनही केलं. पाटील म्हणाले, आपली एकजूट आता सर्वांनी पाहिली आहे. ही एकजूट कायम ठेवा. आपली एकजूट पाहून काही जण शहाणे झाले आहेत. ते आता आपल्यासारखे वागू लागले आहेत. परंतु, आपण आपला विषय मागे पडू द्यायचा नाही. मला अपेक्षा आहे की हे सरकार येत्या १३ जुलैपर्यंत आपल्याला आरक्षण देईल आणि नाही दिलं तर यांचे २८८ आमदार पडलेच म्हणून समजा.