मालेगावमध्ये आशा दिन उत्साहात साजरा

आशा स्वयंसेविका म्हणजे आरोग्यरूपी वटवृक्षाची जणू मुळेच आहेत डॉ. ठोंबरे

वाशिम – आरोग्य विभाग मालेगाव यांच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आशा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले, आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका या आरोग्य यंत्रणेचा पाया आहेत. त्या आरोग्यरूपी वटवृक्षाची जणू मुळेच आहेत. मानधनावर काम करीत असून सुद्धा कामातून मिळणारे समाधान हीच कामाची पावती असे मानून कामामध्ये सातत्य आणि गुणवत्ता याचा समतोल राखण्याची उल्लेखनीय कामगिरी आशा स्वयंसेविका करीत आहेत. “रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकारलेल्या आशा स्वयंसेविका समाजातील प्रत्येक घटकाला विविध माध्यमातून उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करीत आहेत. अगदी बाळ जन्माच्या अगोदर पासून गरोदर मातेची नोंद ते एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद घेण्याची काम आशा करीत असल्याची माहिती दिली. याव्यतिरिक्त डॉ. ठोंबरे जिल्हा यांनी उपस्थित आशांना स्वयंसेविकांना अतिसार, कुपोषण, लसीकरण, न्युमोनिया, बालमृत्यू, मातामृत्यू, आरोग्यसंबंधित योजना, अंधश्रद्धा सारख्या अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीम. अश्विनी खासबागे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले त्यावेळी त्यांनी आशा दिनाची पार्श्वभूमी आणि त्याचे महत्व विषद केले.

आशा स्वयंसेविका देत असलेल्या आरोग्य सेवेची यादी त्यांनी सर्वांसमोर मांडली. त्यामध्ये गरोदर महिलेची नोंद, तिला वेळोवेळी भेटी देणे, तिला शासकीय दवाखान्यात संस्थेत डिलिव्हरी करण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच डिलिव्हरीचे वेळी गरोदर महिले सोबत जाणे, जन्म झाल्यानंतर बाळाची नोंद घेणे व संबंधित ग्रामपंचायतीस कळविणे, निव्वळ स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे, बाळाचे संपूर्ण लसीकरण करून त्यास विविध जीवघेण्या आजारांपासून पूर्ण संरक्षित करणे, बालकाचे कुपोषण होऊ नये याकरिता विटामिन ए, जंतनाशक औषधी, आयर्न सिरप मिळेल याची खात्री करणे. शाळेतील मुलांना नियमित लोहयुक्त गोळ्यांचे वाटप होईल याकरिता पाठपुरावा करणे. किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता विषयी समुद्रेशन करणे, नवविवाहीतांची नोंद घेणे, विवाहित स्त्रियांच्या मासिक पाळी व्यवस्थापनाची नोंद ठेवणे, कुटुंब नियोजन साधनांचा वापर करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत योग्य तो सल्ला व मार्गदर्शन करणे, तीस वर्षांवरील सर्व व्यक्तींची असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत तपासणी करून घेणे, मधुमेह व उच्च रक्तदाब अजून आलेले व्यक्तींना उपचाराखाली आणून त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करणे, क्षयरुग्ण, कुष्ठरुगण, हिवताप रुग्ण, डेंग्यू रुग्ण नियमित उपचार घेत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, दीर्घ आजाराने आजारी असलेल्या तसेच अंथरूणावर खिळून असलेल्या रुग्णांना समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत वेळोवेळी तपासणी उपचार करणे, वयोवृद्ध लोकांची काळजी व सुश्रुषा विविध माध्यमातून करणे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची नोंद घेणे व ग्रामपंचायतीस कळविणे. अशी सर्व कामे आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून होत आहेत.

या सर्व कामातून वेळ काढून आशा स्वसेविकांना एक हक्काचा दिवस मिळावा, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित राहावे, त्यांचेमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आरोग्य विषयक कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी व्हावी याकरिता आशा दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. श्रीम. खासबागे यांनी दिली. या कार्यक्रमास राखी पिंपरकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक, प्लान इंडिया संस्थेमधील दिनेश प्रजापती, स्टेट मॅनेजर महाराष्ट्र, सुरज पवार, प्रकल्प समन्वयक, धनश्री श्रीमंतवार, डिस्ट्रिक्ट लीड सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स एंड किड्स अंडर ५ प्रकल्प यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्त्याने प्लान इंडिया, सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स एंड किड्स अंडर ५ प्रकल्प टीमद्वारे हाथ धुणे आणि ओआरएस बनविणेचे प्रात्यक्षिक करून दाखविले व आय. डी. सी. एफ पंधरवडा कार्यक्रम आणि सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स एंड किड्स अंडर ५ प्रकल्पामध्ये होणा-या कार्यक्रमांबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन तालुका आशा पर्यवेक्षक मोहम्मद नूर शेख यांनी केले. आभार विस्तार अधिकारी बाबाराव दामोदर यांनी मानले.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )