सरपंचांच्या मनमानीला कंटाळून चार ग्रा. प. सदस्यांचे सामूहिक राजीनामे
मानोरा – तालुयातील वाई गौळ (अमरगड) या अकरा सदस्य (सध्या दहा, एक मयत झाल्याने) असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या भ्रष्टाचाराला पूरक व विकास कामांना मारक धोरणामुळे येथील तब्बल चार ग्रा.पं. सदस्यांनी संवर्ग विकास अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून आपले राजीनामे आज सादर केले आहेत. तत्पूर्वी या सदस्यांनी रीतसर ग्रा.पं. सरपंचांना सुद्धा लेखी राजीनामे सुपूर्द केल्याने तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत सदस्य यांनी दिलेल्या लेखी राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, वाईगौळ येथील विद्यमान सरपंचांनी पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांच्या वार्डातील नागरिकांच्या रास्त व न्याय प्राथमिक समस्या ग्रा.पं. कार्यालयात वारंवार मांडूनही त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे जनतेने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ आणि पात्र ठरलेलो नाही. मतदारांचा
विश्वासघात होत असल्याची जाणीव होताच आणि हा विश्वासघातास पूर्णपणे सरपंच जबाबदार असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. सन २०२१ पासून आजतागायत ग्रा.पं. सदस्यांच्या मासिक सभा केवळ सात ते आठ झाल्या असून, इतर बाकीच्या सभा ह्या कागदोपत्री दाखवून सदस्याच्या घरोघरी जाऊन सभेच्या प्रोसाईडिंग रजिस्टरवर सह्या घेतल्या गेल्याचे आरोप सुद्धा राजीनामा दिलेल्या ग्रा.पं. सदस्य यांनी केले आहे. सभाच कागदोपत्री होत असल्याने गावातील नागरिकांच्या समस्यांना ग्रा.पं.
कार्यालयातील सभेत चर्चा होऊन वाचा फुटत नसल्याने गावाचा विकास खुंटत असल्याबाबत सरपंचांना वारंवार सुचित करूनही त्याकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप राजीनामा सादर करण्यात आलेल्या सदस्यांकडून सरपंचांवर करण्यात आला आहे. राजीनामा देणारे सदस्य
ताराचंद मोहन राठोड, किसन भिला आडे, प्रमिला सुभाष जाधव आणि आरती महेश जाधव यांनी सरपंचाची मनमानी, भ्रष्टाचाराला समर्थन व विकास कामांकडे दुर्लक्ष असा ठपका ठेवत राजीनामा सादर केला आहे.