अभिनव उपक्रमाद्वारे पार पडलेल्या शिवविवाहाने घडविला नवा आदर्श
Innovative Shiv Wedding in Risod
रिसोड : ( दि. 24 जून ) स्थानिक मंगल कार्यालयात दि. 23 जून रोजी एक आगळावेगळा शिवविवाह पार पडला. या विवाहाच्या माध्यमातून वर-वधू पक्षाने काही अभिनव पायंडे समाजापुढे मांडले. मर्यादित खर्चात आणि साध्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याचे रिसोड शहरात आणि पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
मोप येथील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता गजानन खंदारे यांची कन्या प्राजक्ता हिचा शिव विवाह कोयाळी येथील कैलास भिसे यांचे सुपुत्र गोपाल यांच्याशी रिसोड येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला. समाजात अनिष्ठ घडत असताना केवळ त्यावर टीका करून चालत नाही. तर समाजासाठी जे काही इष्ट असेल, त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. स्वतःच्या घरापासून परिवर्तनाला सुरुवात करावी लागते.
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळजना.
तुकोबारायांच्या या विचारांनी प्रेरित होऊन वधूचे माता-पिता लता आणि गजानन खंदारे, मराठा सेवा संघ रिसोड, जिजाऊ ब्रिगेड रिसोड , संभाजी ब्रिगेड रिसोड व व इतर कक्षाचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने सामाजिक संदेश देणारा हा अनुपम असा शिवविवाह यशस्वीरित्या संपन्न झाला. विवाहाची शिवपंचके पंडितराव देशमुख यांनी सादर केली. यावेळी चेतन सेवांकुर आर्केष्ट्रा च्या दिव्यांग कलावंतांनी बहारदार गिते सादर केली.
सोयरीक जुळविणाऱ्यांचा केला सन्मान
खंदारे आणि भिसे परिवाराचा हा ऋणानुबंध घडवून आणण्यासाठी दिगंबर भिसडे कोयाळी आणि महादेवराव पोफळे चिवरा यांनी मध्यस्थ्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. म्हणून त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल दोन्ही मध्यस्तांना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले. विवाह मध्यस्थांचा सन्मान करणारा हा पहिलाच विवाह असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
मान्यवरांचा ग्रामगीता देऊन केला सत्कार
या शिव विवाहास कृषी,राजकीय,सामजिक, शैक्षणिक,वित्तीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परंतु लग्न वेळेपूर्वीच सर्व मान्यवरांना ग्रामगीता आणि राष्ट्रसंतांची भगवी टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे सत्कारासाठी वेगळा वेळ खर्च झाला नाही आणि लग्न समारंभ वेळेवर संपन्न झाला. त्यामुळे कोणालाही विनाकारण ताटकळत बसावे लागले नाही, हे विशेष!
प्री वेडिंग शूट आणि पाव्हणकी साक्षगंधास दिला फाटा
हल्ली प्री वेडिंग शूटची प्रचंड धूम सुरू आहे. परंतु या विवाह सोहळ्यात प्री-वेडिंग शूट, पाव्हनकी, साक्षगंध अशा खर्चिक बाबींना फाटा देण्यात आला होता. एकूणच या विवाह सोहळ्यात संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळण्यात आले होते.
वधू-वरांनी विधायक सहजीवनाची शपथ घेऊन परस्परांना दिली वृक्ष भेट
शिवश्री पंडितराव देशमुख यांच्या पौराहित्याने संपन्न झालेल्या शिवविवाह सोहळ्यात वधू-वरांनी महापुरुषांचे स्मरण करून प्रथमतः विधायक सहजीवनाची शपथ घेतली. त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा म्हणून परस्परांना वड-पिंपळाचे वृक्ष भेट दिले. सोबतच वृक्ष संवर्धनाची ग्वाही सुद्धा दिली.