अनसिंग ग्राम पंचायत मध्ये शासनाच्या निधीतून झालेल्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा ९ जुलै पासून आमरण उपोषण
यश चव्हाण यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वाशिम : अनसिंग ग्राम पंचायतमार्फत आणि शासनाच्या विविध
योजनेच्या निधीतून झालेल्या सर्व कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, याची चौकशी करुन भ्रष्टाचारास व गैरप्रकारास जबाबदार असलेल्या पदाधिकारी, अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर फौजदारी कारवाई करा अन्यथा ९ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्यांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना मनविसे वाशिम जिल्ह्याचे यश चव्हाण यांनी दि. ४ जुलै दुपारी १ वाजताच्यादरम्यान दिला.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनसिंग ग्रामपंचायतीने सरकारी दवाखाना परिसरात श्री. सतीश दांगटे यांच्या घरापासून खडसिंग चौफुली रस्त्यापर्यंत नालीच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला.
शहरातून जमा करण्यात आलेल्या एका ठिकाणी साठविण्यात आलेल्या कचर्यावर योग्य प्रक्रिया व नियोजन करण्यात येत नाही. प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. ६ मध्ये घनकचर्याचे व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील दोन वर्षापासून बंद असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीवर लाखो रूपयाचा खर्च दाखवून भ्रष्टाचार होत आहे.
मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये दररोज स्वच्छता, साफसफाई न करता लाखो रुपयाचा अपहार, गावातील प्रभाग क्रं. ६ मध्ये लावण्यात आलेले लाईटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन दुरुस्तीच्या नावावर दरवर्षी लाखो रूपयाचा अपहार होत आहे, पंतप्रधान आवास, रमाई आवास, एम.आर.ई.जि.एस. अंतर्गत नागरिकांना व शेतकर्यांना मिळणार्या अनुदानात पैशाची मागणी करुन त्रास देणार्याची चौकशी करावी, १५ वा वित्त आयोग अंतर्गत महिला व बालकल्याण, शाळा मागासवर्ग वस्ती मध्ये ईतर कामामध्ये हजारो रूपयाचा अपहार, या अन्य कामामध्ये मोठ्या प्रमाणात होणार्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येवून जवळपास २० हजार लोकसंख्या असलेल्या अनसिंग ग्रामपंचायतीला कामयस्वरूपी ग्रामविकास अधिकारी दयावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.