भक्तांवरील आतंकवादी हल्ल्याचा वाशीम येथे निषेध
वाशीम – जम्मू – काश्मिरमधील वैष्णो देवी, कटारा ते शिवखोरी येथे जात असणार्या हिंदू भाविकांच्या बसवर पाकिस्तान पोषित जिहादी क्रूर आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून १० भाविकांची हत्या केली. याचा निषेध म्हणून वाशीम येथे १२ जून रोजी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिहादी आतंकवांद्याचा निषेध करुन यात्रेदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली देखील अर्पण केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठवून अशा जिहादी संघटनावर देशव्यापी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.भक्तांवर झालेल्या
भ्याड हल्ल्यामुळे संपुर्ण देश दुखावला आहे. या घटनेचा तीव्र संताप समाजामध्ये निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जम्मू काश्मिर ला पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर आशेचा किरण निर्माण झाला आहे. परंतु, दहशतवाद्यांचे मनोधर्य अजून कमी झालेले दिसत नाही. अशा प्रकारचे
आतंकी कृत्य करुन दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. अशा घटकांना आश्रय देणार्या अंतर्गत आणि विदेशी घटकांवर कडक आणि योग्य कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.